कणकवली (सिंधुदुर्ग) - थकबाकी असलेल्या ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करण्याची कारवाई करून देखील सिंधुदुर्गात महावितरणकडे 44 कोटी 22 लाख रुपयांची वीज थकबाकी आहे. पुढील चार दिवसांत ही वसुली न झाल्यास तसेच थकबाकी न भरलेल्या ग्राहकांचाही वीज पुरवठा सुरू असल्याचे आढळल्यास महावितरण अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार आहे.
सिंधुदुर्गातील थकीत ग्राहकांपैकी कणकवली विभागातील 41 हजार 537 ग्राहकांकडे 22.81 कोटींची तर कुडाळ विभागातील 44 हजार 859 ग्राहकाकडे 21.41 कोटी रुपये थकबाकी आहे. यात महत्वाची बाब म्हणजे कणकवली शहरात 15 हजार 92 ग्राहकांकडून 8.89 कोटी आणि सावंतवाडी शहरातील 13 हजार 369 ग्राहकांकडे 6.60 कोटींची थकबाकी आहे. दरम्यान, वीज बिलांचा भरणा करताना ग्राहकांची गैरसोय होऊ नये यासाठी सुटीच्या दिवशी देखील वीज भरणा केंद्रे सुरू ठेवण्याचा निर्णय महावितरणने घेतला आहे.
मागील वर्षभर कोरोना आपत्तीत भरडलेल्या जनतेला दिलासा देण्यासाठी महावितरण कंपनीने जनतेला जुलै पासून वीजबिले हप्त्याने भरायची सवलत दिली. त्यानंतर थकीत ग्राहकांना अतिरिक्त सवलत देखील देण्यात आली. याखेरीज वाढीव वीजबिले आणि त्याअनुषंगाने येणाऱ्या सर्व समस्यांचे निराकरण करण्यासाठी महावितरण कंपनीने अनेक मेळावे घेतले; मात्र थकबाकी तशीच राहिल्याने महावितरण कंपनी आर्थिक अडचणीत आली आहे. यात वीज पुरवठा खंडित करण्याची कारवाई करताना राजकीय कार्यकर्त्यांकडून अडथळे निर्माण होत असल्याने महावितरणचे अधिकारी आणि कर्मचारीही अडचणीत आले आहेत.
सिंधुदुर्गात 44.23 कोटींची रक्कम थकीत असल्याने महावितरणचे मुख्य अभियंता देवेंद्र सायनेकर यांनी 24 व 25 मार्चला वीज थकबाकी परिस्थितीचा आढावा घेतला. यात अनेक ठिकाणी महावितरण कंपनी कर्मचारी थकबाकीदार ग्राहकापर्यंत पोचले नसल्याची बाब लक्षात आली. यामुळे ग्रामीण भागातील वीज ग्राहक बिल भरण्याची तयारी दाखवत असूनही तशी व्यवस्था करण्यात कर्मचाऱ्यांनी कसूर केली आहे का? याचा अहवाल मागवण्यात येत आहे. थकबाकीदारांचा वीज पुरवठा सुरू असल्यास त्याबाबत संबंधित वीज कर्मचारी आणि अधिकाऱ्यांवर कठोर कारवाईचेही निर्देश त्यांनी दिले आहेत.
सुटीच्या दिवशीही भरणा
सध्या वीज बिल थकबाकी वसूल मोहीम सुरू आहे. याच काळात शिमगा हा कोकणवासीयांचा जिव्हाळ्याचा सण देखील आहे. या पार्श्वभूमीवर गावी आलेल्या कोकण वासीयांची गैरसोय होऊ नये, तसेच ज्या वीज ग्राहकांनी हप्त्याची सवलत घेतली आहे, त्यांचा वीज पुरवठा अंतिम हप्ता न भरल्याने खंडित होऊ नये यासाठी महावितरणने बिल भरणा केंद्रे 31 मार्चपर्यंत सुरू ठेवली आहेत, अशी माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली.
संपादन - राहुल पाटील
from Tajya news Feeds https://ift.tt/3sveFW5
via IFTTT
